वृद्धाच्या हातगाडीचे नुकसान,ढालकाठी परिसरातील बैलाच्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल:नगरपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी

⚡कणकवली ता.१७-: कणकवली शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या जनावरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शहरातील ढालकाठी परिसरात एका मोकाट सुटारू बैलाने हातगाडी लावून उभ्या असलेल्या वृद्ध व्यक्तीला मुसंडी मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये बैलाने वृद्ध व्यक्तीला धडक दिल्याचे तसेच त्यांची हातगाडी ढकलून दिल्याचे दिसत आहे. या प्रकारात वृद्धाच्या हातगाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
ढालकाठी परिसरात एक वृद्ध व्यक्ती छोटा स्टॉल लावून उभी असताना अचानक तेथे आलेल्या सुटारू बैलाने त्यांना मुसंडी मारली. बैलाच्या या हल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीला धक्का बसला, तर त्यांची हातगाडीही ढकलली गेली. या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसह पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येनंतर आता मोकाट जनावरांचा हैदोस सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या या जनावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः बाजारपेठ आणि वर्दळीच्या परिसरात अशा जनावरांचा वावर धोकादायक ठरू शकतो. ढालकाठी येथील घटनेतून मोकाट जनावरांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे समोर आले आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांमधून केली जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
