अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार:पाणीटंचाईच्या संकटाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप..

⚡कुडाळ ता.१७-: कुडाळ शहरावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी भांगसाळ नदीचे पाणी तातडीने अडवावे, अशी मागणी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केली आहे. येत्या सात दिवसांत बंधाऱ्याचे काम सुरू करून पाणी अडवण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला कुडाळच्या जनतेसोबत घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भांगसाळ नदीचे पाणी अडवल्यास कुडाळ शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत राहण्यास मदत होईल, तसेच परिसरातील विहिरींची भूजलपातळी टिकून राहील. मात्र, नदीचे पाणी वाहून जात असताना अद्याप बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने शिरसाट यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांना भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. सात दिवसांत अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
