Headlines

आठ दिवसांत दांडीच्या वीज समस्येवर कार्यवाही;

आमदार निलेश राणे यांच्या निर्देशानंतर कामाला वेग!

मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील दांडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर अखेर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. जीर्ण विद्युत वाहिन्या आणि वीजसाहित्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत दांडी परिसरातील जीर्ण वीजवाहिन्या व आवश्यक वीजसाहित्य बदलण्याचे काम सुरू झाले आहे

दांडी किनारपट्टी परिसरातील दांडेश्वरवाडी, श्रीकृष्णवाडी आणि झालझूलवाडी येथे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या कायम होती. परिसरातील विद्युत वाहिन्या सुमारे २५ वर्षांपूर्वीच्या असल्याने त्या जीर्ण झाल्या होत्या. पावसाळ्यात आणि जोरदार वारे वाहत असताना या वाहिन्या तुटून पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबामुळे विद्युत उपकरणांवर होणारा परिणाम आणि संभाव्य अपघातांचा धोका यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
या समस्येबाबत वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित तोडगा निघत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा प्रश्न आमदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने परिसराचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती आणि बदलाची कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वीज वितरण विभागाने कामाला गती दिली.

दांडी परिसरातील वीज समस्येबाबत नगरसेविका अन्वेषा आचरेकर आणि नगरसेवक महेश कोयंडे यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सहकार्य केले. स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि जीर्ण वीजवाहिन्यांमुळे निर्माण झालेला धोका आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

या पाठपुराव्यानंतर वीज वितरण विभागाने जीर्ण विद्युत तारा आणि आवश्यक वीजसाहित्य बदलण्याचे काम सुरू केले आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर अल्पावधीत कार्यवाही सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामामुळे दांडी परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे

केवळ जीर्ण वीजवाहिन्या बदलून न थांबता परिसरातील वीजपुरवठ्याची क्षमता वाढविण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी दांडी परिसरात दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगानेही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी सांगितले.
वीजवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण होण्याबरोबरच ट्रान्सफॉर्मरच्या मागणीवरही निर्णय झाल्यास कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

दांडी परिसरात सुरू असलेल्या कामाची नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका अन्वेषा आचरेकर आणि नगरसेवक महेश कोयंडे यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
या वेळी सुधाकर मालंडकर, अरविंद आचरेकर, राज धुरी, नीलेश केळूसकर, उमेश आचरेकर, रामचंद्र पराडकर, योगेश पराडकर, जगदीश खराडे, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर, मुकुंद आचरेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह मोहन वराडकर यांनीही वीज वितरण विभागाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.

आमदार निलेश राणे यांचे नागरिकांकडून आभार
दांडी परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्येची दखल घेऊन तातडीने कार्यवाही सुरू केल्याबद्दल नागरिकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नगरसेविका अन्वेषा आचरेकर आणि नगरसेवक महेश कोयंडे यांनीही नागरिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. तसेच मालवणच्या विकासकामांमध्ये योगदान देणारे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

You cannot copy content of this page