Headlines

सिंधुदुर्गात जलसुरक्षा आणि सुरक्षित पर्यटनाला मिळणार नवी दिशा!

प्रशासनासोबत एसआरएम कॉलेजचा पुढाकार

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुडण्याच्या घटना रोखणे, जलसुरक्षा वाढविणे आणि पर्यटन अधिक सुरक्षित व शाश्वत बनविण्याच्या दृष्टीने संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या भूगोल विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्यूशन (RNLI), यूके आणि रॉयल लाइफ सेव्हिंग सोसायटी (RLSS) यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत ६ ऑक्टोबर रोजी TISS–RNLI–RLSS पथकाने कुडाळ येथे भेट देऊन जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. TISSचे डॉ. ब्रिनेल डी’सूझा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या पथकात RNLIचे टॉम मॅकक्रॉ आणि RLSSचे कमोडोर अरविंद शर्मा यांचा समावेश होता.
पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाची उद्दिष्टे, प्रस्तावित कामकाज आणि जलसुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही पथकाशी सविस्तर चर्चा केली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे, जलक्रीडा आणि अन्य जलाधारित पर्यटनस्थळे सुरक्षित करणे, तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक समुदायाची आपत्तींचा सामना करण्याची क्षमता वाढविणे, यावर या चर्चेत भर देण्यात आला. जलसुरक्षेच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील पर्यटन अधिक सुरक्षित आणि शाश्वत होण्यास मदत होणार आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागातील डॉ. अनुराधा गावडे आणि डॉ. रविंद्र गावडे यांनी या उपक्रमासाठी स्थानिक समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. पथकाने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधत संशोधन, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञता, प्रशासन आणि स्थानिक समुदाय यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसुरक्षेबाबत जनजागृती, बुडण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना आणि सुरक्षित पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

You cannot copy content of this page