Headlines

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बिबवणेच्या लक्ष्मी नारायण विद्यालयाची बाजी

१७ वर्षांखालील मुलांच्या संघाला तृतीय क्रमांक

कुडाळ : तालुक्यातील बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. जिद्द, चिकाटी आणि सांघिक खेळाच्या जोरावर संघाने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना मात देत विद्यालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.
शालेय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये सातत्याने वर्चस्व राखणाऱ्या बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या संघाने यंदाही आपली विजयी परंपरा कायम ठेवली. तालुकास्तरीय अंतिम सामन्यात पाट हायस्कूलच्या संघाला पराभूत करून जिल्हास्तरावर प्रवेश केला. जिल्हास्तरावर दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आणि वेंगुर्ले संघाला पराभूत करून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.
विभागीय स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोल्हापूर महानगरपालिका संघावर विजय मिळवत संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सांगली संघाकडून पराभव झाल्यानंतरही खेळाडूंनी जिद्द कायम ठेवली. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सातारा संघाला पराभूत करीत तृतीय क्रमांकावर नाव कोरले.
या यशस्वी संघात यज्ञेश पिंगुळकर, दिव्येश तळवणेकर, मयुरेश धुरी, नीरज मेस्त्री, अनुष पिंगुळकर, कार्तिक राटुळ, वसंत धुरी, हर्षदकुमार लिंबाणी, प्रज्ज्वल राऊळ, आयुष जाधव आणि विराज नाईक या खेळाडूंचा समावेश आहे.
मुख्याध्यापक भास्कर पारधी आणि सहाय्यक क्रीडा शिक्षक यशवंत (दादा) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला प्रशिक्षण देण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी ओंकार सावंत, पिट्या कुडपकर, अभिजित चव्हाण, शुभम चव्हाण, अभिषेक वेंगुर्लेकर तसेच ज्येष्ठ शिपाई राजन मांजरेकर यांनीही संघाला मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, संस्थेचे पदाधिकारी व संचालक, मुख्याध्यापक भास्कर पारधी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या कामगिरीमुळे बिबवणे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून, खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page