एसआरएम कॉलेजचं वाचन संस्कृती संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम

कुडाळ : भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या वतीने पडतेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ७३ ग्रंथ भेट देण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानार्जनाची प्रेरणा देणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कथासंग्रह, चरित्रे, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक पुस्तकांच्या वाचनातून विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, शब्दसंपत्ती, कल्पनाशक्ती आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार आहे.
डिजिटल युगातही पुस्तक वाचनाचे महत्त्व कायम असून, लहान वयातच वाचनाची सवय लागल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. या उद्देशाने महाविद्यालयाने सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, डॉ. एस. के. आसोलकर, डॉ. एस. के. पवार, डॉ. बी. ए. तुपेरे, डॉ. डी. जी. चव्हाण आणि डॉ. एस. एस. लोखंडे यांनी आर्थिक सहकार्य केले.
या ग्रंथदान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.
