जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून शाळेच्या इमारतीची पाहणी:अतुल बंगे यांची माहिती..

⚡कुडाळ ता.१७-: हुमरमळा (वालावल) येथील करमळीवाडी शाळेची नवीन इमारत आणि करमळीवाडी रस्त्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिली.
हुमरमळा (वालावल) येथील रामेश्वर विद्यामंदिर शाळेत शारदोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. करमळीवाडी शाळेची इमारत नादुरुस्त असल्याने तिच्या नवीन बांधकामासाठी पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल आणि गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी शाळेची तातडीने पाहणी केली. इमारतीच्या निर्लेखनाचे आदेश देऊन नवीन बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे अतुल बंगे यांनी सांगितले.
करमळीवाडी रस्त्याच्या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, गावातील प्रलंबित विकासकामे राजकारण बाजूला ठेवून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन मुख्याध्यापिका म्हापणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच अमृत देसाई यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपसरपंच रश्मी वालावलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शिल्पा गावडे, अध्यक्षा अपर्णा खडपकर, अंगणवाडी सेविका प्रीती वेगुर्लेकर, संजय पेडणेकर, प्रकाश वालावलकर, उदय खडपकर, वृशाली बंगे, चंद्रकांत पेडणेकर, गणेश वालावलकर, रमा वालावलकर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
