मालवण येथील होतकरू व्यक्तिमत्त्व हरपले….

लीलाधर अंकुश चव्हाण यांचे उपचारादरम्यान निधन_*

*💫मालवण दि.२१-:* मालवण येथील भंडारी ए.सो. हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक, भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे स्कुल कमिटीचे सदस्य, मालवणच्या सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते श्री लीलाधर अंकुश चव्हाण (वय- ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मालवण संतसेना मार्ग येथील रहिवासी असणाऱ्या लीलाधर चव्हाण यांनी मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातून बी ए पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे बीएडची पदवी संपादन करीत शिक्षकी पेशा पत्करला. अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या श्री चव्हाण यांनी सन १९८७ ते १९८९ या दोन वर्षांच्या कालावधीत मसुरे येथील भरतगड हायस्कुल नं. २ मध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेल्या चव्हाण यांनी १९९० ते २०१३ अशी प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणून सेवा बजावली. ३१ डिसेंबर २०१३ रोजी ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित होते. मराठी, इतिहास व भूगोल विषयात त्यांचा हातखंडा होता. इतिहास विषयात त्यांना अधिक रुची व विशेष प्राविण्य होते. कविता लिहिण्याची त्यांना आवड होती. मालवणी भाषेतील ‘माशांचा संमेलन’ ही त्यांची कविता गाजली होती. मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक एकांकिका व नाटकांमधून काम केले. मालवणच्या सिंधुदुर्ग परिमल या जुन्या नाट्य संस्थेचे ते कलाकार होते. लेकुरे उदंड झाली, काळोख देत हुंकार, प्रेमा तुझा रंग कसा, अशी पाखरे येती या व इतर गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते. तसेच दुर्योधन भीमाक लोळवता, विठ्ठल तो आला आला, घोडा करतो बाबांचा या व इतर एकांकिकेतही त्यांनी काम केले होते. अखिल भारतीय नाट्य परिषद मालवण शाखेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. मालवण व वायरी येथे त्यांची सलूनची दुकानेही आहेत. तर मालवण संतसेना मार्ग येथील भैरवी मंदिराच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. नाभिक समाज संघटनेच्या कार्यातही त्यांचा सहभाग असायचा. श्री. चव्हाण सर मित्रपरिवारात लीला या नावाने ओळखले जायचे. त्यांचा मित्र परिवार दांडगा होता. लीलाधर चव्हाण यांच्या निधनाबद्दल मालवण तालुका नाभिक समाजाच्या आवाहनानुसार मालवणातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी दुपारनंतर सलून दुकाने बंद ठेवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. मालवण तालुका नाभिक महिला संघटनेच्या खजिनदार रीमा चव्हाण यांचे ते पती होत. तसेच मालवण तालुका नाभिक संघटनेचे सचिव ऍड. पलाश चव्हाण यांचे ते वडील होत. आज सायंकाळी चव्हाण यांच्यावर सोमवार पेठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page