जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद करण्यात यावी – अमित इब्रामपुरकर…

*💫मालवण दि.२१-:* विविध कामांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतिय कामगारांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला धोका पोहचत असल्याने पोलीस यंत्रणेने जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला परप्रांतीय कामगारांची नोंद करून घ्यावी अशी मागणी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, आंतरराज्य स्थलांतरित कायदा १९७९ ची अंमलबजावणी करा अशी मागणी जिल्हा मनसेने यापूर्वी अनेक वेळा केली होती. आजही जिल्ह्यात परप्रांतीय मजूर, इमारत बांधकाम वाळू व्यवसाय, समुद्रात मच्छीमारी व्यवसायासाठी खलाशी म्हणून हजारोंच्या संख्येने येत आहेत. या कामगारांची नोद होताना दिसत नाही. कोरोना पार्श्वभुमीवर आरोग्य तपासणीही होत नाही, असे अमित इब्रामपुरकर यांनी म्हटले आहे. देवली येथे खाडी पात्रात परप्रांतीय कामगारांवर झालेला हल्ला व त्यात झालेला एका कामगाराचा मृत्यू तसेच बांदा येथे झालेला लमाणी कामगाराचा खून आदी घटना जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचवत आहेत. भविष्यात या परप्रांतीयांकडून दरोडे, घरफोडया, बलात्कार, जीवघेणे हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करत प्रत्येक पोलिस ठाण्यात फोटो ओळखपत्रासहित नोंद ठेवणे आवश्यक असल्याचेही इब्रामपुरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page