*💫कणकवली दि.२१-:* फोंडाघाट येथील जमीन वादावरून पारकर विरुद्ध कातरुड गटात झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातील एकनाथ धोंडू कातरुड वगैरे 6 जणांचा जामीन कणकवली न्यायालयाने नामंजूर करत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. फोंडाघाट येथील पारकर आणि कातरुड या दोन कुटुंबात जमीन वादावरून तुंबळ हाणामारी झाली होती. यातील एका गटातील आरोपी एकनाथ कातरुड व अन्य 6 जणांची पोलीस कोठडी संपल्याने आज कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या मागणीला सरकारी वकील ऍड.गजानन तोडकरी यांनी जोरदार हरकत घेतली. घडलेल्या गुन्ह्यातील जखमी आरोपी अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जखमी गणेश पारकर, संकेत पारकर, अनिल पारकर यांना गंभीर दुखापत झाल्याचे ऍड तोडकरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता आरोपींना जामीन नामंजूर करण्याची मागणी सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी केली. सरकारी वकील तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर न्यायाधीश दीपिका पाटील यांनी एकनाथ कातरुड सह सर्व 6 आरोपींचा जामीन नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सर्व आरोपींची सावंतवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
जमीन वादावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी…
