मनिष दळवी; सव्वा वर्षात साडे तीनशे कोटींच्या ठेवी..
⚡सावंतवाडी ता.१०-: जिल्हा बँकेची १ जुलै १९८३ मध्ये स्थापना झाली. १ जुलै २०२३ रोजी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. २००८ पासून सातत्याने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घौडदौड सुरू आहे. तीन हजार कोटींचा टप्पा ठेवींचा टप्पा गाठत आहोत. साडे पाच हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठत आहोत. कोकणात सर्वात जास्त नफा कमावणारी जिल्हा बँक म्हणून आपली बँक आहे. यावर्षी ९२ कोटींचा वार्षिक नफा झाला आहे. नवीन संचालक मंडळ कार्यरत झाल्यानंतर गेल्या सव्वा वर्षात साडे तीनशे कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. एक हजार कोटींची उलाढाल वाढली असून २० कोटी नफ्यात वाढ झाली आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेने काळानुरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते वेबसाईट, लोकार्पण करीत आहोत. डिजिटल बँकिंगकडे वळत आहोत. ३०० पेक्षा जास्त मायक्रो एटीएम सेवा सुरू करीत आहोत. कॉन्टॅक्ट लेन्स कार्ड सुद्धा सुरू करीत आहोत. या सेवेचे लोकार्पण करीत आहोत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा बँकेच्या विविध अत्याधुनिक सुविधा लोकार्पण कार्यक्रमात बोलताना केले.
