मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील वायरी बांध येथील प्रकाश उर्फ बाबू संभाजी पडवळ (वय ५५) यांचा मृतदेह आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्या नजीकच्या समुद्रात तरंगताना आढळून आल्याने खळबळ माजली आहे . समुद्रात तरंगणारा हा मृतदेह त्या भागात स्कुबा डायविंग करणाऱ्या स्कुबा व्यवसायिकाना दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मालवण पोलिसांना दिली. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मालवण दांडी आणि वायरी किनारी प्रकाश हा बाबू नावाने आणि एक उत्साही व्यक्तिमत्व म्हणून परिचित होता. काल शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो दांडी किनाऱ्यावरून सिंधुदुर्ग किल्ल्यानजिक असलेल्या पद्मगड याठिकाणी चालत जात असताना काही नागरिकांनी पाहिल्याची चर्चा सुरू होती . त्याला दारूचे व्यसन होते.
आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्या नजीकच्या समुद्रात स्कुबा डायविंग करणाऱ्या व्यवसायिकांना एक मृतदेह तरंगताना दिसून आला. समुद्रात अनोळखी मृतदेह आढळून आल्याची माहिती मालवण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस हेडकाँस्टेबल विलास टेंबूलकर, पोलीस सुहास पांचाळ आदी त्याठिकाणी दाखल झाले. त्यानी बोटीने समुद्रात जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. ओळख पटविल्यावर तो मृतदेह प्रकाश पडवळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची खबर प्रकाश यांचा चुलत भाऊ प्रमोद परब यांनी पोलीस स्थानाकात दिली असून पोलिसांनी आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
प्रकाश याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रकाश याच्या पत्नीचे पंधरा वर्षा पूर्वी निधन झाले होते. त्याच्या पश्चात तीन मुली आहेत.
