मालवण शहरात होणार एक दिवस आड पाणीपुरवठा
⚡मालवण ता.०७-: मालवण नगरपरिषदेतर्फे धामापूर तलावातून होणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेमार्फत मालवण शहरात व शहराबाहेर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या धामापूर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्यााने नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा दि. १० एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल,याची मालवण शहरातील सर्व नळधारकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.
एक दिवस पाणी पुरवठा करण्यासाठी मालवण शहराची दोन विभागात विभागणी करण्यात आली आहे. दि. १० रोजी आडारी रोड गणपती मंदिर पर्यत, नारायण मंदिर समोरील शांतीसागर मैदान परीसर, पेट्रोल पंप समोरील परिसर, कुडाळकर हायस्कुल जवळील परिसर, रेडकर हॉस्पीटलच्या आजूबाजूचा परिसर, गवंडीवाडा, दांडी मोरेश्वर मंदिर परीसर, आडवण-वायरी रोड, रामेश्वर मंदिर मागील परिसर, सातेरी मंदिर जवळील परिसर या भागात पाणी पुरवठा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दि. ११ रोजी धुरीवाडा, गारुडेश्वर मंदिर पर्यत, श्रीकृष्ण मंदिर, चिवला बीच ते चौकचार रोड, कोतेवाडा, कचेरी रोड, मेढा काळबादेवी रोड, पोलिस वसाहत ते राजकोट, जयगणेश मंदिर परीसर, भुत आंबा ते रेवतळे चर्च रोड, फाटक शाळा परीसर, भरड ते बंदर जेटी पर्यत, लिमये हॉस्पिटल ते पोस्ट ऑफिस समोरील परीसर या भागात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याच क्रमाने दोन्ही विभागात पुढे एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे.
