शिवरायांच्या जयजयकारात किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वाढदिवस झाला साजरा

प्रेरणोत्सव समिती आयोजित कार्यक्रमाला शिवप्रेमी, पर्यटकांची मोठी गर्दी

मालवण (प्रतिनिधी)

“जय भवानी… जय शिवाजी…. छत्रपती शिवाजी महाराज कि जय… हर हर महादेव” अशा घोषणा देत आणि मोरयाचा धोंड्याचे तसेच शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून आज मालवणात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणात्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमास शिवप्रेमी व पर्यटकांनी उपस्थिती दर्शवली.

स्वराज्यावर समुद्र मार्गे होणाऱ्या परकीय आक्रमणाचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकण किनारपट्टीवर मालवणच्या समुद्रात कुरटे बेटावर ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गची १६६७ साली उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आरामाराची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवलंका सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे दरवर्षी साजरा होतो. किल्ल्याच्या उभारणीस यावर्षी ३५६ वर्षे पूर्ण होऊन ३५७ वे वर्ष सुरु झाल्याने ३५७ वा वर्धापन दिन साजरा झाला. यनिमित्त आज सकाळी ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी झाली त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्गवर शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच शिवप्रार्थना म्हणण्यात आली.

यावेळी शिवराजेश्वर मंदिराच्या अंगणात न्यू छत्रपती ब्रिगेड कोल्हापूर यांचे विविध चित्तथरारक मर्दानी खेळ सादर झाले. तर उद्योजक भूषण साटम यांचा शिव काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम सादर झाला. साटम यांनी विविध शिवकाव्य सादर करीत त्यांचा अर्थ स्पष्ट केला. यावेळी जोरदार घोषणा देत शिवरायांचा जयघोष करण्यात आला. पौराहित्य किरण आपटे यांनी केले. यावेळी किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, सौ. ज्योती तोरसकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, दत्तात्रय नेरकर, शिवराजेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रदीप वेंगुर्लेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, दीपक पाटकर, तृप्ती मयेकर, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, अविनाश सामंत, मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, हेमंत वालकर, रविकिरण तोरसकर, लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष वैशाली शंकरदास, ललित चव्हाण आदी तसेच टोपीवाला हायस्कुलचे विद्यार्थी, शिवप्रेमी नागरिक व पर्यटक उपस्थित होते.

You cannot copy content of this page