कवी आनंदहरी यांच्या ‘कोरडा भवताल’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन….

*💫कणकवली दि.१९-:* सिंधुदुर्गाच्या साहित्य चळवळीत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले कवी आनंदहरी तथा हरिहर कुलकर्णी यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘कोरडा भवताल’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 21 फेब्रु.रोजी दुपारी 2 वा. सांगली महादेववाडी येथील माणकेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. सांगली येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन 21 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात कोरडा भवतालचे प्रकाशन संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आनंदहरी हे गेली अनेक वर्ष कणकवली येथील एसटी विभागीय कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत होते. कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष साहित्य चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले. याच कालावधीत त्यांच्याकडून काव्यलेखन अधिकाधीक लिहिले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध व्हायला लागल्या. या सर्व कवितांचे संकलन म्हणजे कोरडा भवताल मधील कविता होय! ‘कोरडा भवताल’ या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून यात ते म्हणतात, की ‘कोरडा भवताल’ हा कवितासंग्रह समाजलक्ष्यी आणि आत्मलक्ष्यी जाणिवांचा प्रवास अधोरेखित करणारा आहे. या कवितासंग्रहातील कविता आजच्या सहिष्णुतेचा मानवी वर्तनकाळाचे कंगोरे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते. समकालीन विश्वातील राजकीय वृत्ती प्रवृत्तीची आक्रमकता या प्रवृत्तीचा उपहास, स्त्रियांच्या वाट्याला येणारी नानाविध दुःखे, मानवी संबंधांचे विसविशीत होत जाणे, दैनंदिन जीवनात सर्वत्र दिसणारी हिंसा, जगण्यातील अस्वस्थता, दुष्काळ, महापूर अशा अनेकविध जाणिवांचा पट ही कविता विणत जाते.

You cannot copy content of this page