असलदेतील “त्या” अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीसांना आले यश..
*💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील ओझर जंगलमय परिसरात एका बागेत एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह गुरुवारी दि.१८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता आढळला होता.अखेर “त्या” मृतदेहाची ओळख पटवण्यात कणकवली पोलीसांना यश आले आहे.पोलीसांनी सर्व पोलीस ठाण्यात वायरलेस मॅसेज दिल्यानंतर देवगड नाद येथील एक युवती नापत्ता नोंद असल्याचे समजले.त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले.त्यानुसार तो मृतदेह आपली बहीण रतन गंगाराम साटम (वय-३६) हीचा असल्याचे सख्या भाऊ देवानंद गंगाराम साटम यांनी सांगितले. त्यामुळे मयत रतनच्यामृतदेहाचे शवविच्छेदन करत पोलीसांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी सायंकाळी मृतदेहाची माहिती समजताच कणकवली ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सदर मृतदेहाची घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह पुढील तपासासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय शवागृहात ठेवण्यात आला.त्यानंतर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी श्रीमती डॉ. रोहिणी सोळुंके यांनी त्या मृतदेहाची रुग्णालयात पाहणी केली,अधिकाऱ्यांना तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कणकवली पोलिसांनी वायरलेस वरुन सर्व पोलीस ठाण्यांना आढळल्या मृतदेहाची माहिती दिली. त्यावरून देवगड पोलिसांनी आपल्या हद्दीत असलेल्या नाद गवाने गावठणवाडी येथील वेडसर युवती रतन गंगाराम साटम(वय ३६) ही २ फेब्रुवारी पासुन नापत्ता असल्याची नोंद ८ फेब्रुवारीला असल्याचे कळवले.त्यानुसार संबंधित युवतीचे नातेवाईक भाऊ देवानंद गंगाराम साटम यांना कळवले. देवानंद आपल्या नातेवाईक जयवंत तोरस्कर, अभय साटम यांना घेऊन कणकवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेले गाऊन व मृतदेह दाखवला.तिचे वर्णन प्रत्यक्ष पाहिल्यानंतर भाऊ देवानंद साटम व नातेवाईकांनी तो आपली बहीण मृतदेह रतन साटम हिचा असल्याचे सांगत ती २००६ पासून मनोरुग्ण आहे,ती १५-१५ दिवस घरातून गायब असायची.काही दिवसानंतर पुन्हा घरी यायची,नाहीतर आम्ही कुणाच्यातरी सांगण्यानुसार घरी घेवून येत असायचो.आता ती २ फेब्रुवारीला घरातून लाल कलरचे गाऊन घालून घरातून गेली होती.शोधून सापडली नसल्याने आम्ही नापत्ता झाल्याची तक्रार ८ फेब्रुवारीला दिल्याचे भाऊ देवानंद साटम यांनी सांगितले. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर सचिन जंगम व त्यांच्या सहकाऱ्यांनी डी एन ए साठी रिपोर्ट घेतले व शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तिच्या मृतदेहावर देवगड तालुक्यातील नाद गवाने येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यात प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी श्रीमती डॉ. रोहिणी सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला,पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे,कासार्डे बिट अंमलदार रमेश नारनवर,पोलीस नाईक कैलास इंपाळ ,पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी,रुपेश गुरव,चालक श्री.उबाळे,असलदे सरपंच पंढरी वांयगणकर,पोलीस पाटील सावित्री पाताडे, असलदे गावातील ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
