स्थानिक नेतृत्वावर शिवसैनिक नाराज…

दिलेल्या शब्दाशी संघटना ठाम नाही-:बाळा परब

*💫बांदा दि.१९-:* ऐकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार करून पक्ष गावागावत पोहोचवण्यासाठी पाच दिवसांचे राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मळेवाड जि.प.मतदारसंघासारख्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांतून स्थानिक नेतृत्वावर नाराजी पहावयास मिळत आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियान कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील आरोस ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला विश्वासात घेतले नाही. निवडणुकीपूर्वी शिवसेना संघटनेने जो शब्द दिला होता त्याचे पालन करण्यात आले नाही. तालुकास्तरारून सकारात्मक विचार असून सुद्धा स्थानिक नेतृत्वाबद्दल आपण नाराज असल्याचे आमदार दीपक केसरकर तसेच जि. प.सदस्य राजन मुळीक यांचे विश्वासू खंदे समर्थक शिवसेनेचे बाळा परब यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले. संघटनेच्या झालेल्या दुर्लक्षामुळे आपल्यासोबत असलेले शेकडो शिवसैनिकही नाराज झाले असून त्यांच्या रोषाला आपणास सामोरे जावे लागत असल्याचे, बाळा परब यांनी सांगितले. पाडलोस केणीवाडा येथेही शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व पं.स.सदस्य रेश्मा नाईक एका कार्यक्रमासाठी येऊन गेले अन् आपणास थोडीही कल्पना सुद्धा दिली नसल्यामुळे एकंदरीत आपले खच्चीकरण होत असल्याची खंत बाळा परब यांनी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानावर ‘नाराजी’चे सावट येणार की संघटना शिवसैनिकांची नाराजी दूर करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना विभागप्रमुख शरद धाऊसकर यांच्याशी संपर्क साधला असता, बाळा परब यांची कोणतीही नाराजी नसून भविष्यात त्यांच्याबद्दल संघटना निश्चितच सकारात्मक विचार करेल अशी प्रतिक्रिया शरद यांनी दिली.

You cannot copy content of this page