“इवोल्युशन ए क्वेश्चन मार्क” चा गौरव

वाघेरीच्या राणे कुटुंबीयांचा मुंबई पोलीस उपायुक्त यांनी केला सन्मान

⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित,राज्य नाट्य स्पर्धेत, बृहन्मुंबई पोलीस कल्याण संस्थेच्या वतीने, साबा राऊळ लिखित “इवोल्युशन ए क्वेश्चन मार्क” हे नाटक प्रेक्षकांचे लक्षवेधी ठरले. द्वितीय पारितोषकासह सर्व कलाकारांनी आपल्या सर्वांगीण अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली.

आपल्या बुद्धीच्या अन विज्ञानाच्या जोरावर माणसाने भले प्रगती साधली आहे. परंतु त्याने माणूसपण विसरले आहे. अश्मयुगातील मानव आणि आजच्या प्रगत जगातील मानव यात फरक असतानाही, उत्क्रांतीच्या टप्प्यावर माणूस आपले माणूसपण हरवत चालला आहे. पुढच्या क्षणाला काय घडणार ? हे तो सांगू शकत नाही, अशी स्थिती आहे.म्हणूनच माणसाच्या प्रगतीवर प्रश्न उपस्थित करताना त्यावरील भाष्य या नाटकातून, आदिवासी जमातीच्या माध्यमातून दर्शविले आहे. कोविड काळात माणूसपण विसरल्याचे दाखवून दिले आहे.

वाघेरी येथील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिगंबर रावराणे, यांच्या पोलीस दलातील कन्या स्तुती पालव,नात काव्या पालव, आणि नातू प्रतीक पालव यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांनी गौरव उद्गार काढले. याबद्दल पोलीस उपआयुक्त यांनी विशेष समारंभात, त्यांच्या सांस्कृतिक लक्षणीय सहभागाबद्दल सन्मान करून, प्रशस्तीपत्र बहाल केले. चेतन किंजळकर यांनी दिग्दर्शन केले असून, निलेश प्रभाकर-प्रकाश योजना, प्रदीप पाटील- नेपथ्य, शैलेश संजय-स्वप्निल बोरकर यांनी संगीत दिले आहे. जितेंद्र जाधव, परी जाधव, विवेक वेखंडे,आणि नंदकुमार सावंत, प्रवीण गोळे, शेख यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. एकंदरीत हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याची पावती मिळाली आहे.

You cannot copy content of this page