⚡मालवण ता.१९-: महिला दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण सभासद, चौके येथील साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैभवी चौकेकर यांच्या वतीने चौके येथे आयोजित स्मार्ट लेडी स्पर्धेत हडी येथील सौ. आर्या गावकर यांनी विजेतेपद पटकावीत स्मार्ट लेडीचा बहुमान मिळविला. त्यांना युवती सेनेच्या मालवण कुडाळच्या समन्वयक सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते सौ. मीना घुर्ये पुरस्कृत पैठणी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
चौके येथील मंदार गावडे अप्सरा हॉल मध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी महिलांचा प्रतिसाद लाभला. तारकर्लीच्या माजी सरपंच व जिल्हा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष सौ. स्नेहा केरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्नेहा केरकर यांनी मार्गदर्शन केले तर आचरा येथील को.म.सा.प.च्या सदस्य मनाली फाटक यांनी महिलांचे गुण दर्शविणारे गीतगायन केले.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहा चौकेकर यांनी पटकविला. त्यांना आर. जी. चौकेकर (चौके), जीजी मांजरेकर (आंबेरी) व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्याकडून पुरस्कृत अन्नपूर्णा देवीची मूर्ती देऊन सौ. निकिता मंदार गावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांक विजेत्या सौ. राधिका पार्टे यांना सिद्धिश्री माणगावकर, मनाली फाटक, सुरेश चौककर पुरस्कृत कंबरेचा चांदीचा छल्ला देऊन मनाली फाटक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर सौ. पूजा म्हापणकर, सौ. प्रतिभा चौककर, सौ. रोहिणी चौकेकर यांना सौ. वैभवी चौकेकर व प्रणाली गावडे पुरस्कृत उत्तेजनार्थ बक्षिसे सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शांती तोंडवळकर, चव्हाण, गार्गी चौकेकर, सानिका चौकेकर, सुचिता चौकेकर आदी व इतर उपस्थित होते.
