वेंगुर्ला
गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या….! च्या जयघोषात जड अंत:करणात आज रविवारी सायंकाळी वेंगुर्ला तालुक्यात काही ठिकाणी 21 दिवस घरी विराजमान असलेल्या गणपतीचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी पावसाने पूर्णत: विश्रांती घेतल्याने भाविकातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यावर्षी दि. 14 सप्टेंबर रोजी पासून घरोघरी गणपती विराजमान झाले होते. दरम्यान यावर्षी अल निनोचे सावट, बदललेले हवामान व पावसाची विश्रांती यामुळे 5, 11, 17, 21 दिवसात गणपती भक्तीमध्ये खंड न पडल्याने भाविकातून व भजनी मंडळातून समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान तालुक्यात बहुतांशी ठिकाणी 21 दिवसापुढेही गणपती विराजमान असणार आहेत. महालय हंगाम सुरु असुन रविवारी ‘नवमी श्राद्ध’ साठी भाऊक वातावरण होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने जलसंवर्धनाच्या दृष्टीने ग्रामीण भागात बंधारे बांधण्याचे आवाहन केल्याने गावोगावी बंधारे बांधण्यासाठी ग्रामपंचायत, युवकांची तसेच राजकीय पदाधिकारी यांची धावपळ सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री ना. नितेश राणे, भाजपा युवा नेते विशाल परब, यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासन, सर्वच लोकप्रतिनिधी, युवक प्रत्यक्ष फिल्डवर उतरले आहेत.

