आम.नितेश राणे ;ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आम्ही ठरवणार
⚡कणकवली ता.११-:
सिंधुदुर्गात एक मतदारसंघ शिंदे गटाला सोडणार का? या प्रश्नावर बोलताना श्री.राणे म्हणाले, ज्या विनर सीट आहेत, त्या तशाच राहतील. तसेच केसरकर हे शिंदे गटाचे प्रमुख आहेत. त्यामुळे सावंतवाडीत आम्हाला त्यांना निवडून आणावं लागेल. तर खासदारकीसाठी शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. पण कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सेनेचा खासदार निवडून येणार नाही.असे आम.नितेश राणे म्हणाले.
एकेकाळी राणे समर्थक असलेलेच आज ठाकरे सेनेचे सिंधुदुर्गात नेतृत्व करत आहेत. ठाकरे सेनेच्या तीन जिल्हाप्रमुखांपैकी दोन मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर एक जण आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आमच्यावर अवलंबुन आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.
आम. नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. राणे साहेब शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हात ठाकरे स्वत:ची शिवसेना बांधू शकले नाहीत हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राची जनता आज पाहत आहे. सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेना आता जवळपास संपली आहे. आम्ही व्हेंटीलेटरची वायर काढली की लगेच ठाकरे सेनेचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. कारण नुकतेच नेमण्यात आलेले तिनही जिल्हाप्रमुख आमच्या संपर्कात आहेत. यातील दोघे केव्हाही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. तर तिसरा जिल्हाप्रमुख आमच्याकडे येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही आमदार आणि खासदार देखील आमचाच असणार आहे.
