शेतकरी थोडक्यात बचावला : 20 रोजी उपोषण छेडणार; प्रकाश वालावलकर
बांदा : प्रतिनिधी
मडुरा डिगवाडी जवळील काजू बागेत काजू गोळा करताना अचानक विद्युतभारित जिवंत वीज वाहिनी काजूच्या झाडावर कोसळली. वाहिनी शेतकऱ्यापासून पासून अवघ्या चार फुटाच्या अंतरावर पडल्याने सुदैवाने शेतकरी बचावला. वीज वितरणच्या गलथान कारभाराचा फटका आज आम्हाला बसून जीव गमवावा लागला असता. वारंवार वीज अधिकाऱ्यांना सांगूनही अशा घटनांकडे दुर्लक्ष किंवा कामचुकारपणा होत असल्यामुळे येत्या 20 मार्च रोजी मडुरा महसूल मंडळ अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्यास बसणार असल्याचा इशारा काजू बागायतदार शेतकरी प्रकाश वालकर यांनी दिला आहे.
दुपारच्या सुमारास काजू बागायतदार शेतकरी उत्तम वालकर हे आपल्या काजू बागेत काजू गोळा करत होते. त्याच दरम्यान अचानक खांबावरील लोखंडी कॅप तुटून विद्युत भारीत वाहिनी काजूच्या फांदीवर पडली. वाहिनी अंगावर येणार हे लक्षात येताच प्रसंगवधान राखत त्यांनी आपला जीव वाचवण्यात यश मिळविले. याची कल्पना वायरमन यांना देण्यात आल्याचे प्रकाश वालालकर यांनी सांगितले. तसेच वीज वितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा बळी जाऊ शकतो असे सांगत श्री.वालालकर यांनी वीज वितरणवर रोष व्यक्त केला.
दरम्यान, वीज वितरणच्या दुर्लक्षामुळे आपल्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे काजू गोळा करण्यास जावे की घरी बसावे याचे उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे. एकंदरीत सर्व वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 20 मार्च रोजी मडुरा महसूल मंडळ कार्यालयासमोर आपल्या सहकाऱ्यांसोबत उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रकाश वालावलकर यांनी दिला.
