सत्ता असो अथवा नसो,विकासाची प्रक्रिया थांबणार नाही…

आम. वैभव नाईक;किर्लोस दशक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध:गडनदीवर पूल व के.टी.बंधारा दुरुस्ती कामाचे भूमिपूजन

⚡कणकवली ता.०५-: सत्ता असो अथवा नसो,विकासाची प्रक्रिया थाबता कामा नये.या भावनेतून काम करीत असताना किर्लोस गोठणेसह या परिसरातील सर्वच गावांचा विकास साधणारा सेतू या गडनदीवरील पुलाच्या माध्यमातून साधला जात आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गडनदीवर उभा राहणारा पूल हा विकासाचा मार्ग ठरणार आहे. विकासाच्याबाबतीत आम्ही पक्षीय राजकारण करणार नाही. किर्लोस दशक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून किर्लोस ते गोठणे गावातील गडनदीवर पूल बांधणे व के.टी.बंधारा दुरुस्ती कामाचा भूमिपूजन सोहळा आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रामगड सरपंच शुभम मठकर, बाळा हाटले, शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, बंडू चव्हाण, अरुण लाड, दुलाजी परब, राठिवडे उपसरपंच देवेंद्र पुजारे, किर्लोस माजी सरपंच प्रदीप सावंत, मालवण पं. स. चे माजी उपसभापती नाथा मालंडकर,किर्लोस सोसायटीचे चेअरमन स्वानंद भावे, किर्लोसचे उपसरपंच अजित लाड, सुभाष धुरी, बंटी हाटले, प्रा. विलास सावंत, गुरुनाथ चव्हाण, स्वप्नील पुजारे, मानसी भावे, श्रद्धा गावडे, सुकन्या घाडीगावकर, किर्लोसचे
पोलीस पाटील किशोर लाड, गोठणे पोलीस पाटील महेंद्र तळवडेकर, किर्लोसचे माजी उपसरपंच पंढरी घाडीगांवकर, दीपक किर्लोस्कर, दशरथ घाडीगांवकर, अरुण भावे,विकास लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

आम. वैभव नाईक म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत किर्लोस ते गोठणे गडनदीवर पूल बांधण्यासाठी ८ कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे. गडनदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गडनदीवर साकारण्यात येणारा पूल किर्लोस व गोठणे गावाच्या विकासाचा मार्ग ठरणार आहे. नागरिकांना, शेतकऱ्यांना कणकवलीकडे ये-जा करणे शक्य होणार आहे. कणकवली – आचरा मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी ३४ कोटी मंजूर झाले आहेत. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. किर्लोसलगत असलेल्या गावातील रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

किर्लोस, गोठणे, असगणी, गोठणे, श्रावण या पंचक्रोशीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन श्रावण येथे प्राथमिक आरोग्य सुरु करावे, असा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रस्ताव आपण मंजूर करून घेणार असल्याचे आम.नाईक यांनी सांगितले. पंचक्रोशीतील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये म्हणून तत्कालीन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जलजीवन योजनेंतर्गत ५० कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. ही कामे लवकरच सुरु होतील, असे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील जनतेला आरोग्याची दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर देऊन ते सुरु देखील करण्यात आले आहे. पुढील वर्षांपासून जिल्ह्यावासीयांना याठिकाणी चांगल्याप्रकारची आरोग्य सेवा मिळणार आहे. मालवणसह सिंधुदुर्गाचा विकास शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटच करू शकतो, त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन करताना आपण कधाही विकासकामांमध्ये राजकारण केले नाही, यापुढील काळात करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूल बांधण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपतालुकाप्रमुख बाबा सावंत यांनी किर्लोस गावाच्यावतीने आम. नाईक यांचे आभार मानले. या पुलासाठी जमीन दिलेल्यांचे आभार मानले. किर्लोस पंचक्रोशीतील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले. आरंभी आम. वैभव नाईक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रदीप सावंत यांनी सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page