आमदार निलेश राणे:संजू परब हे केवळ राजकीय सहकारी नसून माझ्या घरातील सदस्याप्रमाणे आहे..
सावंतवाडी : “माझ्यापासून लांब जाण्यासाठी संजू परब यांना अनेक लोकांनी मोठ्या ऑफर दिल्या. मला त्यांनी त्या ऑफरचे आकडेही सांगितले; मात्र त्यांनी माझी साथ कधीही सोडली नाही,” असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांच्यासोबतच्या आपल्या राजकीय व सामाजिक संबंधांवर भाष्य केले. “संजू परब यांच्यासोबत माझा संघर्षातील प्रवास राहिला आहे. अनेक अडचणी आणि विरोधाला सामोरे जावे लागले, तरी त्यांनी माझी साथ सोडली नाही. त्यांना माझ्यापासून दूर करण्यासाठी अनेकांकडून मोठ्या ऑफर देण्यात आल्या. त्या ऑफरचे आकडेही त्यांनी मला सांगितले; मात्र त्यांनी त्या आमिषांना बळी न पडता माझी साथ कायम ठेवली,” असे राणे म्हणाले.
“संजू परब हे केवळ राजकीय सहकारी नसून माझ्या घरातील सदस्याप्रमाणे आहेत. माझ्या संघर्षात ते सावलीसारखे माझ्यासोबत उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल बोलताना मला विशेष अभिमान वाटतो,” असेही आमदार राणे यांनी सांगितले.
दरम्यान, “संजू परब यांच्यावर झालेल्या टीकेला पहिले उत्तर देणारा माणूस म्हणजे संजू परब,” असे सांगत त्यांनी परब यांच्या नेतृत्वशैलीचे कौतुक केले. “जोपर्यंत दीपक केसरकर ग्रीन सिग्नल देत नाहीत, तोपर्यंत पुढचे पाऊल टाकू नका,” असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
संजू परब यांच्या इच्छेनुसार कणकवली-मालवणसह जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही आमदार निलेश राणे यांनी यावेळी दिले.
