सावंतवाडी, दि. १९ ऑगस्ट : नगरपरिषद सावंतवाडी, अखिल भारतीय योग शिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ८ दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उद्घाटन सोहळा आज बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५:३० वाजता शांतादुर्गा हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वामीजी व आचार्यजींच्या प्रतिमापूजनाने झाली. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ योगाभ्यासक श्री. शंकर प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ‘घे भरारी’ फाऊंडेशन सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ. ज्योती दुधवडकर, सौ. शीला पोकळे, सौ. स्मिता पोकळे, सौ. अश्विनी पोकळे, सौ. वैजयंती देसाई तसेच योग मार्गदर्शक श्री. शेखर बांदेकर सर उपस्थित होते.
शिबिराचे सूत्रसंचालन श्री. विशाल लातये यांनी तर प्रास्ताविक श्री. समीर हडकर यांनी केले.
याप्रसंगी बोलताना श्री. शेखर बांदेकर सर म्हणाले, “सावंतवाडीतील जनतेने या निःशुल्क शिबिराला उपस्थित राहून दररोज विविध आजारांवरील मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.”
उद्घाटनानंतर श्री. शेखर बांदेकर सर यांनी उपस्थित साधकांकडून सूर्यनमस्कार, विविध आसने व प्राणायामाचा सराव करून घेतला. शिबिराच्या पहिल्याच दिवशी नवीन साधकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शिबिर यशस्वी होत असल्याचे मत सौ. ज्योती दुधवडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. नारायण सावंत यांनी केले.
हे शिबिर दररोज सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन साधकांना शिबिराच्या शेवटच्या दिवशी दि. २६ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे सावंतवाडीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
