⚡बांदा ता.१९-:
श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिरात दररोज भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दररोज रात्री ८ वाजता गावातील ग्रामस्थ एकत्र येत भजन, नामस्मरण व भक्तिगीतांच्या माध्यमातून देवाची आराधना करत आहेत.
श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा जपत ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भजनाच्या माध्यमातून गावात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि धार्मिक भावनाही वृद्धिंगत होत आहेत. विविध पारंपरिक अभंग, भक्तिगीते व नामस्मरणाने मंदिर परिसर दररोज दुमदुमून जात आहे.
गावातील महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रावण महिनाभर दररोज होणाऱ्या या भजन कार्यक्रमामुळे श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिर परिसराला भक्तीचा जागर लाभला आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन व नामस्मरणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात…
