*कसाल मंडल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
सिंधूदुर्गनगरी ता १६ कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लांच घेताना सकाळी रंगेहाथ पकड़ले. सातबारा नोंद मंजूर करण्याकरिता हांगे यानी या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यानी केलेल्या फिर्यादिनुसार सापळा रचून ही कारवाई केली. ओरोस येथील ६० वर्षीय पुरुष व्यक्ती कायदेशीर खरेदी केलेल्या जमीन खरेदी खताची सातबारावर नोंद मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र, मंडळ अधिकारी हांगे यानी यासाठी चार हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यानी हांगे यानी मागणी केलेली रक्कम देण्याचे मान्य केले होते. तसेच याबाबत कुडाळ येथील जिल्ह्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारिची शहानिशा करून आज कसाल येथील मंडळ अधिकारी कार्यालयात तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास पाठविले होते. ही लांच संदीप हांगे यानी स्वीकारल्या नंतर सापळा लावून बसलेल्या लाचलूचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सिंधूदुर्ग जिल्हा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री कांबळे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक श्री केणी, हवालदार रेवंडकर,परब, पोलिस नाईक पोतनीस, पालकर, सहाय्यक पोलिस नाईक फाले यानी ही कारवाई केली. यावेळी उपअधीक्षक श्री कांबळे यानी ‘कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कींवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ दूरध्वनी क्र 02362-222289 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
