*वैयक्तिक लाभाच्या योजनेचा ९९ लाभार्थ्यांना देण्यात आला लाभ

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात आला लाभ; तर व्यवसायिक प्रशिक्षण देण्यासाठी २७५ जणांची निवड*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा, ९९ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे .तर फळ प्रक्रिया, फॅशन डिझायनिंग, ब्युटीपार्लर यासारखे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी २७५ लाभार्थींची निवड करण्यात आली असल्याची माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी सभेत दिली. जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीची सभा सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, सदस्य सायली सावंत ,वर्षा कुडाळकर, संपदा देसाई, राजलक्ष्मी डिचोलकर आदींसह खातेप्रमुख ,तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला व मुलींसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून घरघंटी पुरवणे योजनेअंतर्गत ५२ लाभार्थी, शिलाई मशीन पुरवणे योजनेअंतर्गत ३१ लाभार्थी अशा एकूण ९९ लाभार्थीच्या प्रस्तावाना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे योजनेअंतर्गत फळप्रक्रिया ९० लाभार्थी, फॅशन डिझायनिंग ८५ लाभार्थी तर ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी १०० लाभार्थींची अशा एकूण २७५ लाभार्थींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व लाभार्थींना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे .याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी सभेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंगणवाडी सेविका ४३ पदे, मदतनीस १२९ पदे, तर मिनी अंगणवाडी सेविका यांची १८ पदे अशी एकूण १९० पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र उमेदवारांची निवड यादी तयार करून ती आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे .त्यांच्या मंजुरीनंतरच संबंधितांना नियुक्त्या देण्यात येतील. अशी माहिती महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page