शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीचे आयोजन
*💫मालवण दि.१६-:* छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने कांदळगावची भूमी पावन झाली आहे. त्यामुळे शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने कांदळगावात प्रथमच शिवजयंतीनिमित्त ‘दुग्धाभिषेक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. १९ रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिराला अभिवादन करून शिवजयंतीला प्रारंभ होईल. त्यानंतर कांदळगाव येथे छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली. शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ‘दुग्धाभिषेक’ सोहळा शिवजयंतीचे विशेष वैशिष्ट्य आहे. शिवगर्जनाच्या पदाधिकारी, शिवप्रेमी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराजेश्वर मंदिरातील मुर्तीला अभिवादन करून दुधाचा कलश घेऊन शिवजयंतीला सुरुवात करतील. त्यानंतर १० वाजल्यानंतर शिवप्रेमींनी बंदरजेटी- फोवकांडा पिंपळ-धुरीवाडा- कोळंब- ओझर- कांदळगाव या मार्गावरून येणाऱ्या कलशात दूधदान करावे. कलश मार्गामध्ये शिवचरित्र पोवाड्यांचे सादरीकरण होणार आहे. मालवणहून आलेल्या दूध कलशाचे कांदळगाव येथे ग्रामस्थ आणि युवकांच्यावतीने सवाद्य जंगी स्वागत होणार आहे. दुपारी १२ वाजता श्री रामेश्वर मंदिरासमोरील ऐतिहासिक वटवृक्षाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शिवप्रेमीना ‘दुग्धाभिषेक’ करण्याची संधी आयोजकांमार्फत दिली जाणार आहे. दूध कलशामधील एक लीटर दुधाने अभिषेक होणार असून उर्वरित दूध उपस्थित जनतेला, शिवप्रेमींना पिण्यासाठी देण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे पालन करून शिवजयंती उत्सव होणार आहे, असे शिवगर्जना प्रतिष्ठानने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
