काळानुरूप बदलणारा यशस्वी होतो
वाय आर राजूरकर

मालवण (प्रतिनिधी)

जुन्या काळातील विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्याला अपवाद नाही. काळाप्रमाणे स्वतःला जो बदलतो तोच यशस्वी होतो, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण मधील भंडारी हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेल्या सन १९७३ ते १९७५ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यामध्ये ३८ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. त्यावेळी उपस्थित माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर हे बोलत होते.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन स्वागत आणि सत्काराने झाली. शाळेतील शिक्षक आणि नववी, दहावीच्या विद्यार्थिनीनी माजी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्या नंतर मुख्याध्यापक वामनराव खोत यांनी त्यांना शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. यामध्ये नवीन उपक्रमांचा समावेश होता. यावेळी कॉम्प्युटर लॅब, बालवाडी आणि नर्सरी यांची माहिती दिली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जमा केलेली ८३,६६६ रुपयांची मदत शाळेचे मुख्याध्यापक वामनराव खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक वामनराव खोत, माजी शिक्षक रवींद्र वराडकर, वाय. आर. राजूरकर, जयवंत ढोलम, सौ. संध्या पाटकर उभयता आणि शाळेचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष दशरथ कवटकर उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गाणी व इतर कलांनी या संमेलनात रंगत आणली. यामध्ये रत्नाकर सोहनी, अरविंद कोरगावकर, विद्या म्हापसेकर, गजा मालंडकर, ऍड. उल्हास कुलकर्णी, दिलीप मांजरेकर, विलास सरमळकर यांनी विविध कला सादर केल्या. भारती कोरगावकर- नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page