शिक्षकेत्तर संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौंड यांचे प्रतिपादन*
*💫मालवण दि.१४-:* शिक्षकेतर कर्मचारी हा प्रत्येक शाळेचा कणा आहे असे म्हटले जात असले तरी तो कणा वाकला किंवा मोडला तरी त्याच्याशी कोणाला देणेघेणे नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. विद्यार्थी संख्येवर आधारित होणारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, थांबलेली भरती प्रक्रिया, बदलेलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मारक ठरणाऱ्या तरतूदी यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीची शाश्वती उरलेली नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात असून आपल्या न्याय हक्कांसाठी केजी टू पीजी च्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौड यांनी मालवण येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा मेळावा रविवारी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन आरवली सोन्सुरे संस्थेचे आजोबा क्षेत्राधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्ष सतीश नाडगौड, कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. चेतन पाटील, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले चित्रकथी कलाकार परशुराम गंगावणे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे माजी सचिव उमेश सुखी, सिंधुदुर्ग शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष आनंद लोके, जि. प. समाजकल्याण सभापती सौ. शारदा कांबळे, रेडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तथा सदस्या गायत्री सातोसकर, जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे, उद्योजक अमेय तेंडोलकर, सुहास देसाई आदी व इतर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधवाना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण, उच्च शिक्षण पदवी प्राप्त शिक्षकेतर कर्मचारी पाल्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रत्येक तालुक्यातून एक लिपिक व एक चतुर्थश्रेणी, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करून पुरस्कार देण्यात आले. संघटनेच्या सुरुवातीला ज्या शिक्षकेतर बांधवांनी संघटनेत आपले महत्वपूर्ण योगदान दिले, अशांचाही विशेष गौरव यावेळी करण्यात आला. प्रारंभी जिल्हाध्यक्ष अनिल राणे यांनी प्रास्ताविक केले यावेळी सतीश नाडगौड म्हणाले, आज नोकरीची शाश्वती नसल्याने शिक्षकेतर कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी क्रांती घडवली पाहिजे. मात्र क्रांती एका दिवसात घडत नाही. यासाठी सर्व स्तरावरील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. अभ्यासपूर्ण लढा दिला पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठ संकल्पना बंद होत आहे, शालांत परीक्षा बंद होतेय. यामुळे क्लार्कची कामे कमी होणार आहेत. अनुदान द्याव्या लागणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून सरकार अंग काढून घेत आहे. खासगीकरणावर भविष्यात भर राहणार आहे. २०२५ पासून शिक्षण क्षेत्रात कंत्राट पद्धती सुरू होईल. म्हणजेच या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचारी कमी करण्याची पायाभरणी नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. त्यामुळे भवितव्य अंधारात आहे. भविष्यातील धोके ओळखून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी एकत्र आले पाहिजे, असेही नाडगौड म्हणाले. यावेळी ऍड.चेतन पाटील म्हणाले, प्रत्येकाची शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी नाळ जुळलेली असते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे एकमेकांवर अवलंबून असलेले घटक आहेत. आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत. संघर्ष नाही केला तर न्याय मिळत नाही. कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे. नव्या पिढीला देशाचा इतिहास सांगणे गरजेचे आहे. राजकीय क्षेत्रात किमान शिक्षणाची अट घालणे महत्वाचे असून तशी संविधानात तरतूद केली पाहिजे, असेही ऍड. पाटील म्हणाले. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी चित्रकथी, कळसूत्री या कलेबाबत माहिती देत आपल्याला नव्हे तर आपल्या कलेला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, पद्मश्री हा मी माझ्या कलेचा सन्मान समजतो असे सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रांत कलेवर भर देण्यात यावा असे सांगत त्यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे सचिव गजानन नानचे, कार्याध्यक्ष बी. बी. चव्हाण, मालवण अध्यक्ष सौ. शर्मिला गावकर, तालुका सचिव रुपेश खोबरेकर, गजानन मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन उदय घाटवळ यांनी केले.
