⚡मालवण ता.०८-: कांदळगाव शाळेचा विजय असो… शिक्षकांचा विजय असो… पालकांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत आज कांदळगावातून शोभयात्रा काढत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ या प्रशालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ या प्रशालेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने गावातील ग्रामस्थानी एकत्र येत या शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे ठरविले. यानिमित्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती तर्फे दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी गावातून शोभायात्रा काढण्यात आले. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला वंदन करून व सकडे घालून मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या ऐतिहासिक वडाच्या झाडापासून या शोभयात्रेला सुरुवात झाली. रामेश्वर मंदिर ते खांबडवाडी पर्यंत ही शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.
यावेळी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पारकर, उपाध्यक्ष सुधाकर राणे, सत्यवान परब, सचिव पांडुरंग राणे, खजिनदार आशिष आचरेकर, सल्लागार उमेश कोदे, सरपंच रणजित परब, उपसरपंच दिव्या बागवे, ग्रा. पं. सदस्य शारदा मुळये, अनघा कदम, संतोष पारकर, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस हेमंत राणे, राजन डिचवलकर, समिती सदस्य शशिकांत परब, मधुसूदन परुळेकर, कल्याण कदम, श्रीराम परब, आनंद आयकर, दिनेश बेलवलकर, वैष्णवी राणे, आत्माराम साळकर, प्रवीण पारकर, विश्वास मुळये, आबा साळकर, उदय कदम, संतोष कदम, राजन कोदे तसेच शिक्षक इजाबेल फर्नांडिस, संध्या मेथर, पल्लवी राणे, शर्मिला वळवी आदी उपस्थित होते.
शोभायात्रे नंतर सायंकाळी ४ वाजता तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. तर रात्री प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १, कांदळगाव परबवाडा तसेच ओझर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यनिमित्त उद्या ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळा कांदळगावचे भजन, ७ वाजता ज्येष्ठ कवी दादा मडकईकर यांचे सुस्वर कविता गायन, रात्री ८ वाजता विविध मान्यवर व माजी शिक्षक विध्यार्थी यांचा सत्कार होणार आहे. रात्री साडे नऊ वाजता कांदळगाव परबवाडा महिला मंडळ प्रस्तुत हुंडाबळी ते हुंडाबंदी हे नाटक सादर होणार आहे, त्यानंतर गावातील माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
