⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी जंगल परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. राहुल संजय झेंडे ( २५, रा. वडारवाडी, उत्तर शिवाजी नगर, सांगली मिरज ) असे त्याचे नाव आहे. शिवापूर येथे तो गवंडीकाम करीत असे. काही दिवसांपूर्वी तो आपल्या सहकार्यासमेवेत येत असताना वाटेत हरवला होता.
शिरशिंगे गोठवेवाडी येथे अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ड्युमिंग डिसोजा व हवालदार मनोज राऊत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनंतर पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. सतत दारुच्या नशेत असल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्याच मानसिक स्थितीत तो वाट चुकला असावा व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सायंकाळी उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे तसेच उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सांगलीतील युवकाचा शिरशिंगे गोठवेवाडीत सापडला मृतदेह
