नांदरुख येथे वाळू वाहतुकीवर कारवाई

वाळू माफियांना तहसीलदार श्रीधर पाटील यांचा दणका

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाकडून कारवाई सुरूच असून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज शनिवार पहाटे वाळू माफियांना पुन्हा एकदा दणका दिला. नांदरुख मार्गावर वाळू भरुन वाहतूक करणारे तीन डंपर महसूल विभागाने पकडले असून तिन्ही डंपर तहसील कार्यालयात आणण्यात आले आहेत. तर शुक्रवारी रात्री कुपेरी घाटीत खडीची बेकायदेशीर वाहतूक करणारा डंपर पकडल्यानंतर हा डंपर कारवाई दरम्यान पळून गेला असून या डंपरच्या चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांच्या पथकाने सध्या बेकायदेशीर वाळू, खडी, चिरे यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाने आज नांदरुख मार्गावर डंपर क्रमांक – जीए ०९ यु ३३५८, केएल ६२ बी ९८३५ व एमएच ०७ एक्यू ६७१० हे तीन विनापरवाना वाळू वाहतून करणारे डंपर पकडले. तर काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या दिशेने खडी घेऊन जाणारा एक डंपर (क्र. केए २१ सी ३९८५) मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना आढळून आला. त्यांनी चौकशी करता डंपर चालकाकडे खडी वाहतुकीचा दुपारपर्यंतचा पास असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदारांनी हा डंपर अडविल्यावर धामापूर आंबेरी तलाठी सुहास कल्याणराव यांनी डंपर ताब्यात घेऊन पंचनामा केला. या डंपर वर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा डंपर तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना चालकाने डंपर नादुरुस्त असल्याचा बनाव करत डंपर पळवून नेला. त्यामुळे डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page