ग्रामसेवक बदलीसाठी तारकर्ली सरपंचांचे उपोषण यशस्वी

सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याचे केले मान्य

मालवण दि प्रतिनिधी
तारकर्ली काळेथर गावचे ग्रामसेवक कामकाजात सहकार्य करत नाहीत. ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रापचा खाते बदल रखडला आहे. विकास कामे ठप्प पडली असून पूर्ण वेळ ग्रामसेवकासाठी येथील सरपंच मृणाली मयेकर यांना प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. सरपंचांसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली असून लवकरच पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देतो असे आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सरपंच मयेकर यांना दिले आहे. या आश्वासनानंतर उपोषण तूर्तास स्थगिती केले असल्याचे मयेकर म्हणाल्या.

तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी पदभार स्वीकारून पाऊण महिना संपत आला आहे. तरीही ग्रामसेवक सहकार्य करत नसल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प पडला आहे. मासिक सभेला उपस्थित राहायचे सोडून ग्रामसेवक रजेवर गेले. याबाबत ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना नाही. आसे असताना ग्रामपंचायतीचा कारभार कसा करायचा? विकास कामे ठप्प असून ग्रामस्थांना दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध व्हावा यासाठी सरपंच मृणाली मयेकर यांनी सहकारी सदस्य व ग्रामस्थांसमवेत गुरुवारी पंचायत समिती जवळ उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या समवेत उपसरपंच बजरंग कुबल, अनघा कुबल, जयवंत सावंत, स्नेहाली केळुसकर, तन्वी मेस्त्री, प्रेरणा सावंत, घनश्याम सावंत, भिवाजी कोळंबकर, अजिंक्य पारकर, नंदकिशोर टिकम, संदीप भोवर, महेंद्र चव्हाण, मेघनाथ मयेकर, प्रफुल्ल मांजरेकर, गजानन कुबल, सुरेश बापार्डेकर, आनंद बोवलेकर, मिथिलेश मिठबावकर आदी उपस्थित होते.

दरम्यान सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून रेवंडी येथील ग्रामसेविके जवळ तारकरलीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला असल्याचे सांगितले तसेच पूर्णवेळ ग्रामसेवक मिळण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page