भंडारी हायस्कूलच्या मुलांनी पठण केले अथर्वशीर्ष

माघी गणेश चौक येथील सार्वजनिक गणेश जयंती उत्सव उत्साहात सुरू

मालवण दि प्रतिनिधी
मालवण माघी गणेश चौक येथील सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्या वतीने साजरा केला जाणारा पंचेचाळीसव्या माघी गणेश उत्सव आणि मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होत असतानाच गेले तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. आज माघी गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या चौथ्या दिवशी श्री गणेशाला सहस्त्र मोदकांचा नैवेद्य गणेश भक्तांनी अर्पण केल्यानंतर मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण करून श्री गणेशाची आराधना केली यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण येथील माघी गणेश चौकात गेली पंचेचाळीस वर्ष सार्वजनिक माघी श्री गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तर यावर्षी श्री गणेश मंदिराचा सातवा वर्धापनदिन होत आहे या वर्धापनदिन सोहळ्यास २४ जानेवारी पासून सुरुवात झाली असून या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर युवा वर्गासाठी आकर्षक असे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहे. आज गणेश भक्तांनी श्रींच्या चरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण केला तर मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या इयत्ता सहावी मधील ५० मुला मुलींनी अथर्वशीर्ष पठण करून गणरायाची आराधना केली. श्री गणेश हे विद्येची देवता मानली जाते त्यामुळे भंडारी हायस्कूलने गेली काही वर्ष कोरोनाचा काळ वगळता गणेश चतुर्थीच्या काळात मालवण शहर आणि परिसरातील घरोघरी तर माघी गणेश उत्सवात अथर्वशीर्ष पठण केले आहे. यावर्षी प्रशालेचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या प्रेरणेने सहाय्यक शिक्षिका श्रीमती मेस्त्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी अथर्वशीर्ष पठण केले . भंडारी हायस्कूलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उद्या शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी माघी गणेश येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून रात्री साडे नऊ वाजता चांडाळ चौकडी हे नाटक सादर करण्यात येणार आहे तर २९ जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी पाच वाजता श्रींचे विसर्जन केले जाणार आहे.

You cannot copy content of this page