⚡वैभववाडी ता.२७ संजय शेळके-: शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, विहिरींची पाणीपातळी चांगली रहावी व एकूणच भूगर्भातील जलस्तर वाढावा यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित कृषि महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी, राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास शैक्षणिक वर्ष 2022-23 अंतर्गत
सांगुळवाडी -मधलीवाडी येथील सुखनदीपात्रात वनराई बंधारा बांधला. यामध्ये तृतीय वर्ष कृषि पदवीच्या ‘जलसृष्टी’, ‘जलसिंचन’, ‘किचन किंग’ आणि ‘National youth’* या स्वयंसेवकांच्या चमूंनी श्रमदान, भोजन, स्वच्छता इत्यादीचे सूक्ष्म नियोजन करून हा वनराई बंधारा बांधून जलसंधारणाच्या संदर्भात समाजोपयोगी उपक्रम राबवला.
त्यांना कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री गायकवाड टी.बी. व सहाय्यक प्राध्यापक श्री हवालदार ए. एच. यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना वनराई बंधाऱ्यांद्वारे होणारे जलसंधारण, उन्हाळी शेतीसाठीचे महत्व व भूजल पातळी उंचावण्यासाठीचे होणारे फायदे याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील डी. बी. यांनी मार्गदर्शन केले.
याठिकाणी श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री संदीप पाटील व सचिव श्री. सुधाकर येवले यांनी उपस्थित राहून सर्व रासेयो स्वयंसेवकांचे कौतुक केले.
या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
