*रस्त्याच्या झालेल्या दूर्दशेमुळे कांदळगाव येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन*

*💫मालवण दि.१२-:* वर्षभरापूर्वी पासून खड्डेमय बनलेल्या ओझर-कांदळगाव-मसुरे या रस्त्याच्या दुरूतीसाठी निधी मंजूर होऊनही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यातून वाटचाल करावी लागत आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणेही मुश्किल बनले असून या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असल्याने संतप्त बनलेल्या कांदळगाववासीयांनी आज सकाळी अचानक कांदळगाव राणेवाडी तीठा येथे रास्तारोको आंदोलन छेडले ग्रामस्थांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्या अडविल्या गेल्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक खोळंबली दरम्यान, आजारी व्यक्ती, शाळकरी मुले यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांची प्रवास व्यवस्था ग्रामस्थांनी केली होती. पोलिसही फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर होते. यासंबंधीचे अधिक वृत्त असे की जवळपास वर्षभर ओझर- कांदळगाव- मसुरे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना चालणे किंवा गाडी चालवणे मुश्किलीचे बनले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी अलीकडेच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर काही प्रमाणात रस्त्याच्या दुरुस्तीविषयीची बांधकाम खात्याकडून हालचालही सुरू झाली होती. एकीकडे ही परिस्थिती असताना आज अचानक कांदळगाव वासीयांनी सर्वपक्षीय रास्ता रोको केला या आंदोलनास पंचायत समिती सदस्य सोनाली कोदे, ग्रामपंचायत सदस्य मनोज आचरेकर, युवानेते बाबा परब, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने यांनी पाठिंबा दर्शवला. शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महिला वर्गानेही आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उमेश कोदे यांनी रस्त्याची झालेली दुर्दशा, अपघातामुळे जखमी झालेले ग्रामस्थ यांच्या व्यथा मांडल्या. तसेच ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी प स सदस्या आणि माजी सभापती सोनाली कोदे याही आक्रमक बनल्या. या रस्त्याबाबत पंचायत समिती सभेत नेहमी प्रश्न उपस्थित करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे आता बांधकाम अधिकाऱ्यांनी तोंडी नको लेखी आश्वासन द्यावे. अशी भूमिका कोदे यांनी मांडली. तर बाबा परब यांनीही बांधकाम विभागाला महिनाभरात रस्ता काम सुरू करण्याची डेडलाईन ग्रामस्थांच्या वतीने दिली. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता नितीन दाणे आंदोलस्थळी हजर झाल्यानंतर याआक्रमक बनलेल्या ग्रामस्थांनी रस्ता कधी होणार ते लेखी द्या असे सांगितले . दरम्यान या रस्त्यासाठी वर्षभरापूर्वी २ कोटी निधी मंजूर होता. मात्र कोरोनामुळे काम थांबले. या रस्ता कामास मंजुरी मिळण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवले आहेत. महिनाभरात काम मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पत्र बांधकाम अभियंता दाणे यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी काही जणांनी फोनद्वारे आमदार वैभव नाईक यांना कळविल्यानंतर आठ दिवसात रस्ता करण्याचे आश्वासन दिले. *दीड तासांनी आंदोलन मागे* कांदळगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी खड्डेमय रास्तेप्रश्नी रास्तारोको जनआंदोलन छेडले. अखेर बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दीड तासांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. बांधकाम अभियंत्यांनी दिलेले लेखी आश्वासन निर्णायक ठरले.

You cannot copy content of this page