Headlines

जिल्हा परिषद सदस्य कक्षाच्या दुरवस्थेवर रुपेश पावसकर आक्रमक

आठ दिवसांत सुविधा उपलब्ध न केल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत कक्षातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खुर्च्या घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयालगत सदस्यांना विश्रांती घेण्यासाठी आणि आपापसांत चर्चा करण्यासाठी सदस्य कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अध्यक्षांनी पदभार स्वीकारून सुमारे सात महिने उलटले तरी या कक्षाच्या देखभालीकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचे पावसकर यांनी निदर्शनास आणून दिले.
सदस्य कक्षातील आसन व्यवस्था खराब झाली असून खुर्च्यांमधील कापूस बाहेर आला आहे. तसेच कक्षातील वॉटर कुलर बंद अवस्थेत असून, पंख्याचीही व्यवस्था नसल्याने सदस्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांच्यासाठी वातानुकूलित कार्यालयांची व्यवस्था असताना, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या कक्षात मात्र मूलभूत सुविधांचाही अभाव का, असा सवाल पावसकर यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद सदस्य हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या कक्षात स्वच्छता, चांगली आसन व्यवस्था, पंखा आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या आठ दिवसांत सदस्य कक्षाची स्वच्छता करून आसन व्यवस्था, पंखा, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खुर्च्या घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रुपेश पावसकर यांनी दिला आहे.
या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून या समस्येवर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page