Headlines

दुष्काळावर मात करण्यासाठी नेरूर मतदारसंघात उपाययोजनांचा आढावा…

भातशेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा:जि प उपाध्यक्ष दादा साईल यांचे निर्देश..

⚡कुडाळ ता.०२-: जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, भातशेतीचे नुकसान आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. नेरूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
“शासकीय योजना, लोकसहभाग आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून जलसमृद्ध सिंधुदुर्ग घडवूया आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करूया,” असे आवाहन दादा साईल यांनी यावेळी केले.
कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याचा उपक्रम साईल यांनी हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नेरूर मतदारसंघातील बैठकीत शेतीचे नुकसान, ई-पीक पाहणी नोंदणी आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भातपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कच्चे बंधारे आणि वनराई बंधारे उभारणे, नदी-ओहोळांमधील गाळ काढणे तसेच नादुरुस्त बंधारे, पाझर तलाव आणि तळी यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायती आणि प्रशासकीय यंत्रणांनी आतापासूनच यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक आराखडे तयार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ, पीककर्ज आणि नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी महत्त्वाची असल्याचे सांगत, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन साईल यांनी केले.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच पाणी संवर्धन आणि बचतीला प्राधान्य देत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि रब्बी हंगामातील पिकांचे योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रत्येक बाधित कुटुंबाला आणि शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला नेरूरच्या सरपंच भक्ती घाडीगावकर, वालावलचे सरपंच राजा प्रभू, कवठीच्या सरपंच स्वाती कारलकर, सरंबळचे सरपंच रावजी कदम, कृषी विस्तार अधिकारी महादेव खरात यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बचतगटांच्या सीआरपी आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page