⚡सावंतवाडी, ता. २-: सावंतवाडी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा बाजार येथील जीवन रक्षा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा गांधीजींचे अहिंसेचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले. त्यांच्या विचारातून समाजाला एकता, शांतता व देशसेवेची प्रेरणा मिळते, असेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी सावंतवाडीचे नगरसेवक तवकीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर व जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर यांच्या हस्ते शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने तवकीर शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी त्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, विनायक ओटवणेकर, अमिदी मेस्त्री, सुमेधा सावंत, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, प्रदीप चौगुले, आफताब हेरेकर, सुभाष नाईक, नगरसेवक तवकीर शेख, अन्वर खान, पीटर फर्नांडिस, विनायक सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
