ज्ञानेश्वर कानडे;टीडीएफ संघटनेचा पाठींबा;महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील विजयी होणार
⚡कणकवली ता.२५-: शिक्षणाच्याबाबतीत राज्य सरकार असंवेदनशील आहे.
जुनी पेन्शन व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरतीबाबत सरकार भुमिका घेत नाही.हे प्रश्न सुटण्यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार बाळाराम पाटील यांना टीडीएफ संघटनेने आपला पाठिंबा दिला असून त्यांचा पहिल्या फेरीत विजय होईल, असा विश्र्वास महाराष्ट्र शिक्षक संघ फेडरेशनचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी केला.
कणकवली येथे पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र शिक्षक संघ फेडरेशनचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी आपली भूमिका मांडली.यावेळी महाराष्ट्र शिक्षक संघ फेडरेशनचे राज्य समन्वयक पाडुरंग काळे, कोकण विभागाचे सचिव लक्ष्मण पावसकर, फेडरेशनचे पदाधिकारी बी. पी. म्हात्रे, शिक्षक सेना संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष रमेश लहारे, अध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष अच्युत वणवे, माजी सचिव उमेश सुकी आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर कानडे म्हणाले,केंद्र व राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून शिक्षकांवर अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात टीडीएफ संघटना लढा देत आहे. तसेच राज्य सरकारने २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती केलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही मंगळवारी सिंधुदुर्गात आलो होतो. दिवसभर आम्ही विविध शाळांना भेटी दिल्या. या भेटीत महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार बाळाराम पाटील यांना पाठिंबा असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा पहिल्या फेरीत विजय होईल. बाळाराम पाटील यांनी मागील सहा वर्षांत आपल्या आमदार निधीतून रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पालघर जिल्ह्यातील शाळांना कोट्यवधींचा निधी मिळवून दिला आहे. आपल्या आमदार फंडातून त्यांनी अनेक शाळांना शैक्षणिक साधने व संगणक देऊन निधीचा चांगल्याप्रकारे विनियोग केला आहे. शिक्षण व राज्यातील शिक्षकांचे प्रश्न व समस्यांबाबत त्यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे.
श्री. कानडे म्हणाले, शासनाने पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी महाराष्ट्र शिक्षक संघ फेडरेशनची मागणी असून ही योजना लागू होण्यासाठी आम्ही न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढत आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील हे निवडून आल्यानंतर जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा करतील. राज्य शासनाने शिक्षक व शिक्षकेत्तर भरती बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. तसेच विनाअदानीत शाळांचे अनुदानदेखील बंद केल्यामुळे या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. हे एक सामाजिक दुखणे बनले असून सरकारने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पुरोगामी शिक्षक संघटना, टीडीएफ, बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी पाठिंबा दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
