ट्रॉलर मालक संघटना अध्यक्ष अशोक तोडणकर यांची टीका
मालवण दि प्रतिनिधी
राज्य सरकारने मच्छीमारांना मंजूर केलेला डिझेल परतावा हा केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आम. नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून विरोधकांनी याचे फुकाचे श्रेय घेऊ नये. आम. वैभव नाईक यांना अडीज वर्षाच्या सत्ताकाळात डिझेल परतावा मिळवून देता आला नाही त्यामुळे त्यांच्या टिल्लू पिल्लू कार्यकर्त्यांनी आम. नाईक यांच्यामुळे डिझेल परतावा मिळाला असे बरळणे बंद करावे अशी जोरदार टीका ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष व भाजपचे नेते अशोक तोडणकर यांनी केली आहे.
मालवण भाजपच्या कार्यालयात अशोक तोडणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर उपस्थित होते. यावेळी अशोक तोडणकर म्हणाले, यापूर्वी मच्छीमारांना डिझेल परताव्यापोटी काही लाखांचीच रक्कम मिळत होती. मात्र आता राज्यातील भाजप- शिंदे सरकारने ६ कोटी एवढा परतावा प्रथमच मंजूर केला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आम. नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने राज्य सरकार व मत्स्य विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गेल्या अडीज वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही आम. वैभव नाईक यांना येथील मच्छीमारांना परतावा मिळवून देण्यात अपयश आले. परताव्यापासून मच्छीमार वंचित राहिले. त्यामुळे विरोधकांनी फुकाचे श्रेय घेऊ नये. आम. नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे डिझेल परतावा मिळाल्याची गर्जना करू नये, खोट्या बातम्या पसरवून जनतेची व मच्छीमारांची दिशाभूल करू नये. डिझेल परतावा मिळवून देण्याची, मच्छीमारांना न्याय देण्याची धमक फक्त राणेंमध्येच आहे असेही तोडणकर म्हणाले.
