⚡कणकवली ता.१७-: कणकवली -टेंबवाडीतील विजापूरवासिंय भक्तांची नवसाला पावणारी देवी म्हणून नावारूपास आलेल्या श्री भाग्यवंती देवीचा जत्रोत्सव गुरुवार १९ जानेवारीला होत आहे. या जत्रोत्सवाला कर्नाटकातील विजापूर आदी परिसरातून मोलमजुरीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हांत आलेल्या हजारो भाविकांची गर्दी असते.
यंदाचा हा १९ सावा जत्रोत्सव आहे. टेंबवाडीतील रामचंद्र शामसुंदर राणे उभयताचा नवस पुर्ण झाल्याने त्यांनी मंदिरासाठी जमीन दिली. भाविकांनी संघटितपणे ” श्री भाग्यवंती देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केली. यंदाच्या वर्षी ट्रस्टने लगतची आणखी जमीन खरेदी करून देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. भाविकांनी सढळ हस्ते देणग्या दिल्याने हे काम पूर्ण झाले. विशेषत: मंदिरासमोरच मारुतीची समाधी बांधण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कणकवली बाजारपेठेत वीजेच्या धक्क्याने मृत झालेल्या माकडाचे इथे विधीवत दफन करण्यात आले होते.
गुरुवारी सकाळपासून ओटी भरण्याचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रो या समाजातील स्थानिक कलाकारांनी बसविलेल्या “हळ्ळी हुल्ली कोट्ट बेळ्ळी कालुंगर अर्थात रैतन कन्नीरीगे यारु आसरे” हे पोराणिक नाटक होणार आहे. तर शुक्रवार २० जानेवारीला सकाळी १० वाजता देवीची वाजत-गाजत मिरवणूक आणि गंगास्नान होणार आहे.
