कांदळगाव सडा या ठिकाणी ३० ब्रास अनधिकृत वाळू साठा केला सील
⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक यावर मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर अनधिकृत वाळू उत्खनन, वाहतूक यावर एक प्रकारे आळा बसला असताना बेकायदेशीर वाळू साठ्यावर धडक कारवाई करणाऱ्या तहसीलदारांनी आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कांदळगाव – महान रस्त्यावर कांदळगाव सडा या ठिकाणी ३० ब्रास अनधिकृत वाळू साठा सील केला आहे.
कांदळगाव येथून महान कडे जाणाऱ्या रस्त्यावर कांदळगाव सडा येथे दोन दिवसांपूर्वी हा वाळू साठा करण्यात आला होता. यातील काही वाळू तेथून नेल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या महसूल पथकाने या ठिकाणी धडक देत वाळूसाठा जप्त केला आहे. पंचनामा व प्राथमिक तपासणीत हा वाळूसाठा ३० ब्रास असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे. पंचां समोर वाळू साठा सील करून कांदळगाव पोलीस पाटील यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. तर जमीन मालक यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही मंगळवारी केली जाणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
अनधिकृत वाळू उपसा, वाळूची विनापरवाना वाहतूक, अनधिकृत वाळू साठा याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपली कारवाई आणखी तीव्र केली आहे. यामध्ये वाळू साठ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून आतापर्यंत शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे.
