पुरातन संस्कृती, धार्मिक पर्यटन स्थळांचे ई बुक प्रकाशनाला सुरुवात

पेंडूर मांड येथे पेंडूर एक धर्मपीठ ई पुस्तक प्रकाशनाने झाला प्रारंभ;तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी केली सुरुवात

मालवण दि प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास असल्याने या भागातील पुरातन संस्कृती आणि धार्मिक पर्यटन स्थळे याचा अनमोल ठेवा जगातील १०४ भाषेत ई- बुक च्या माध्यमातून प्रसारित करण्याचे शिवधनुष्य पर्यटन व्यावसायिक महासंघाने उचलले आहे त्याचा शुभारंभ पेंडुर गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळ आणि देवीच्या मांडाच्या उत्सवाच्या साक्षीने पेंडुर- एक धर्मपीठ या ई- बुकने होत आहे. इथला पर्यटनातून शाश्वत विकास साधायचा असेल तर अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज आहे असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पेंडुर येथे बोलताना केले.

पेंडुर येथील श्री देव वेताळ आणि श्री देवी सातेरी मंदिरात गेले बारा दिवस देवीचा मांड सुरू असून या मांडाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि श्री देव वेताळ, सातेरी, रवळनाथ, पावणाई, लिंग आदी देवस्थान ट्रस्ट कमिटी पेंडुर यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडुर – एक धर्मपीठ हे ई- बुक काढण्यात आले असून त्याचा प्रकाशन सोहळा बुधवारी रात्री मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतिहास संकलन समिती सिंधुदुर्गचे प्रकाश नारकर, पर्यटन व्यावसायिक संघ मालवणचे अध्यक्ष अविनाश सामंत, मंगेश जावकर, किशोर दाभोलकर, ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत, सचिव अमित कुलकर्णी, दाजी सावंत, वरची गुरामवाडी उपसरपंच आबा कामतेकर, मंडळ अधिकारी राठोड, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी ट्रस्ट च्या वतीने अमित कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत यांनी तहसीलदार पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी बोलताना तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, पेंडुर गावचा इतिहास ई- बुकच्या माध्यमातून प्रकाशित होतोय ही अभिनव अशी कल्पना असून ती सुखाव आहे. मोबाईल वरील संदेश वाचन वाढल्याने निश्चितच पेंडुर एक धर्मपीठ हे ई- बुक घराघरात पोहोचेल असा आशावाद व्यक्त करतानाच ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला धार्मिकतेची फार मोठी परंपरा आहे इथल्या मंदिरातील उत्सवांमुळे उत्साह निर्माण होऊन इथल्या माणसांचे जीवन सुखकारक बनते गोव्याचे कल्चर आणि सिंधुदुर्गचे कल्चर यात फार मोठा फरक आहे इथले किनारे, इथली मंदिर, इथला निसर्ग हे आपले वेगळेपण जपून आहे. या भागाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर हे कल्चर घराघरात पोहोचले पाहिजे आणि हे काम पर्यटन व्यावसायिक महासंघ करत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी प्रकाश नारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाचे महत्त्व आपल्या।मनोगतात विशद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री संजय नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page