Headlines

नवरात्रोत्सवाच्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’विषयी जनजागृती;…

महिलांसाठी उपलब्ध मदत सेवांची माहिती.:वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांची विशेष उपस्थिती…

⚡वैभववाडी ता.१८-: दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडी यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित नऊ दिवसीय सामाजिक जनजागृती उपक्रमांतर्गत सहाव्या दिवशी महिलांच्या संरक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ या महत्त्वपूर्ण शासकीय मदत यंत्रणेविषयी जनजागृती करण्यात आली.

महिलांवरील हिंसाचार, कौटुंबिक छळ, शारीरिक व मानसिक अत्याचार तसेच इतर संकटांच्या परिस्थितीत महिलांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे. या केंद्रामार्फत वैद्यकीय मदत, समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन, पोलीस मदत आणि सुरक्षित निवारा अशा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. महिलांनी अन्याय किंवा हिंसाचार सहन न करता योग्य वेळी मदत घ्यावी आणि गरजू महिलांना उपलब्ध शासकीय यंत्रणांची माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. पाताडे यांनी केले.
या जनजागृतीपर उपक्रमाला वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मा. मनोज सोनवलकर, माजी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती श्री. जयेंद्र रावराणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जिल्हाधिकारी माननीय श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमाच्या संकल्पनेतून महिलांचे संरक्षण, सन्मान, स्वावलंबन आणि सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती केली जात आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे, संकटाच्या काळात योग्य मदत उपलब्ध होणे आणि प्रत्येक महिलेला सन्मानाने जगता येणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘महिला सुरक्षित, तर समाज सुरक्षित’ हा संदेश देत मंडळाने नवरात्रोत्सवातील सामाजिक जनजागृती उपक्रमाची वाटचाल सुरू ठेवली आहे.
या सामाजिक जनजागृती उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, सचिव संजय रावराणे व मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष पुढाकार घेतला.

You cannot copy content of this page