Headlines

शेर्लेतील ‘होम मिनिस्टर’मध्ये सुप्रिया वारंग पैठणीच्या मानकरी…

अर्चना धुरी द्वितीय, तर अस्मिता आरोसकर यांना तृतीय क्रमांक; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡बांदा ता.१८-: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि सान्वी सिताराम धुरी हिच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांच्या वतीने शेर्ले येथील माऊली मंदिरात आयोजित ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात सुप्रिया वारंग यांनी पैठणीचा मान पटकावला. अर्चना धुरी यांनी द्वितीय, तर अस्मिता आरोसकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तीन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, कौशल्याधारित स्पर्धा आणि धमाल उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक फेरीत महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आपले कौशल्य, समयसूचकता आणि चातुर्य दाखविले. चुरशीच्या अंतिम फेरीत सुप्रिया वारंग यांनी बाजी मारत पैठणीची मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. विजेत्यांचा उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
खेळादरम्यान हास्य-विनोद, टाळ्यांचा कडकडाट आणि महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमात रंगत आली. नवरात्रोत्सवाच्या आनंदात महिलांना एकत्र आणत मनोरंजनासोबतच स्नेहभाव आणि स्पर्धात्मकतेचा अनुभव देणारा हा उपक्रम ठरला. सान्वीच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे निवेदन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जे. डी. पाटील आणि स्वाती पाटील यांनी केले. त्यांच्या उत्स्फूर्त, मिश्कील आणि प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदोत्सवाच्या वातावरणामुळे शेर्ले येथील नवरात्रोत्सवात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.
फोटो:-
शेर्ले येथे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर व ग्रामस्थ.

You cannot copy content of this page