कणकवली कॉलेजच्या विशेष गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांचा सत्कार; कणकवली महाविद्यालयास विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सवात घवघवीत यश.

कणकवली:
“आज आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात जो अभूतपूर्व यश मिळवले आहे. हे संस्थेची परंपरा, प्रामाणिक गुरुजनांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे फळ आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे केवळ एक टप्पा नसून, भविष्यात यशाची मोठी शिखरे सर करण्याची सुरुवात आहे. कणकवली कॉलेजने नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना हव्या त्या सर्व सोयी-सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. कलाकारांनी आणि खेळाडूंनी आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवून जिद्द, कठोर परिश्रम आणि नम्रतेच्या बळावर आपले व आपल्या गावाचे नाव संपूर्ण राज्यात आणि देशात उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलपंत डेगवेकर यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित कणकवली महाविद्यालयाचा ‘विशेष गुणगौरव कार्यक्रम २०२६-२७’ नुकताच महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त अमोल कामत, श्री. शिवराम म्हसकर, मंदार सापळे, प्राचार्य. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, सांस्कृतिक विभागाचे डॉ. सुरेश पाटील, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, प्रा. हरिभाऊ भिसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, युवा महोत्सव समन्वयक प्रा. आशिष नाईक, पत्रकार दर्शन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सव व विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील गुणवंत विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंचा याप्रसंगी सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यंदाच्या युवा महोत्सवात झोनल पातळीवर कणकवली महाविद्यालयाने सलग दुसऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. कणकवली कॉलेजने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले, “आज कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हा केवळ एक सत्कार सोहळा नसून, ती पुढील वाटचालीस मिळालेली प्रेरणेची थाप आहे. मोठ्या पदाची किंवा यशाची कोणतीही सीमा नसते, ते मिळवण्यासाठी सतत धडपड करावी लागते. कलावंत व खेळाडूंचे पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत, कारण जे जमिनीवर पाय ठेवून चालतात, तेच आकाशाकडे उच्च भरारी घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिक्षक आई-वडिलांसारखे उभे असतात आणि आपली संस्था प्रत्येक क्षेत्रात मुलांसाठी हव्या त्या सर्व संधी व आर्थिक-नैतिक पाठबळ उपलब्ध करून देते. विद्यार्थ्यांनी हे यश असेच कायम ठेवावे आणि भविष्यात आंतरराज्य व राष्ट्रीय पातळीवर कॉलेजचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सुरेश पाटील यांनी महाविद्यालयाच्या यशाचा विस्तृत आढावा घेतला. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवात महाविद्यालयाच्या तब्बल ४८ विद्यार्थ्यांनी ३९ वेगवेगळ्या कलाप्रकारांत सहभाग नोंदवला होता. यामध्ये महाविद्यालयाने विद्यापीठ पातळीवर ९ सुवर्ण पदक आणि पाच कांस्यपदकासह तब्बल १८ हून अधिक पदके पटकावत ऐतिहासिक यश मिळवले. तसेच, प्रा. हरिभाऊ भिसे , पत्रकार भगवान लोके , प्रा. सोमनाथ कदम, प्रा. आशिष नाईक , प्रा. महादेव माने यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी शुभम जाधव आणि माधुरी मेस्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा. सचिन दर्पे, डॉ. गीता कुणकवलेकर, प्रा. सुकन्या तांबे, प्रा. मीनाक्षी सावंत, प्रा. प्रविण कडूकर, प्रा. रतन मोरे, प्रा. विजय सावंत, आणि प्रा जयश्री कसालकर प्रा. हेमंत गावित यांनी परिश्रम घेतले
यावेळी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश भुसे यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणास (NEP) अनुसरून लिहिलेल्या ‘वंडर्स ऑफ फिजिक्स (पार्ट १)’ आणि ‘एनर्जी सोर्सेस (पार्ट २)’ या दोन पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी 100 हून अधिक गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप तेली यांनी केले, तर उपस्थितांच्या आभार प्रदर्शनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
