अहवाल शासनाकडे सादर:सत्यापन प्रक्रियेची(ग्राउंड ट्रूथिंग) कार्यवाही सुरू..

⚡सिंधुदुर्ग, दि. १८-: खरीप हंगाम २०२६ मध्ये जिल्ह्यातील ट्रिगर-१ व ट्रिगर-२ अंतर्गत समाविष्ट ८ ही बाधित तालुक्यांमधील सर्व २६ हजार ५६५.७८ हेक्टर क्षेत्रातील ५१ हजार १०५ शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. सध्या बाधित क्षेत्राच्या सत्यापनाची कार्यवाही सुरू असून, ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून एकत्रित अहवाल अहवाल कृषी आयुक्तालयास सादर केला आहे. जिल्ह्याचा समावेश ट्रिगर १ मध्ये झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी समन्वयाने ही कार्यवाही पूर्ण केली.
जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण, कणकवली, देवगड, वेंगुर्ला आणि कुडाळ या आठही तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतीची माहिती संकलित करण्यात आली आहे. पीकनिहाय बाधित क्षेत्राचे वर्गीकरण करून शेतकऱ्यांची संख्या अंतिम करण्यात आली आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने पंचनामे अचूकपणे पूर्ण करणे, माहितीची पडताळणी करणे आणि तालुकानिहाय अहवाल वेळेत सादर करणे यावर प्रशासनाने भर दिला. महसूल कृषी व ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून बाधित क्षेत्राची एकत्रित माहिती तयार केली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन संबंधित विभागांच्या समन्वयातून कार्यवाही करीत आहे.
तालुकानिहाय तपशील
जिल्ह्यातील एकूण ५१ हजार १०५ शेतकऱ्यांच्या २६ हजार ५६५.७८ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे –
दोडामार्ग तालुक्यात १७३० शेतकऱ्यांचे ७४९.५० हेक्टर जिरायत क्षेत्र, सावंतवाडी तालुक्यात ६४६६ शेतकऱ्यांचे ३ हजार २४५.२९ हेक्टर जिरायत क्षेत्र, वैभववाडी तालुक्यात ३८७३ शेतकऱ्यांचे १ हजार ३९१.५९ हेक्टर, मालवण तालुक्यात ७ हजार ७५७ शेतकऱ्यांच्या ४ हजार ७३३.२७ हेक्टर तर कणकवली तालुक्यात जिरायत व बागायत मिळून ८७१२ शेतकऱ्यांचे ४ हजार ५३६ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. देवगड तालुक्यात ६२९० शेतकऱ्यांचे १ हजार ९६९.१९ हेक्टर क्षेत्र, वेंगुर्ला तालुक्यात २९१९ शेतकऱ्यांचे ९८०.६५ हेक्टर तर कुडाळ तालुक्यात १३३५८ शेतकऱ्यांच्या ८ हजार ९६०.२९ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
00000
